Alvaar मराठी साहित्य ब्लॉग लोगो

फक्त तुझी साथ हवी !

by Akash Gadhave · डिसेंबर 3१, २०२५

fkt-tujhi-sath-hvi_3

रश्मीचे बाबा रश्मीला समजावत होते, "हे बघ आमचं ऐक. याच्यासोबत राहून काही फायदा नाहीये. अजूनही वेळ आहे. आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते."

रश्मी म्हणाली, "मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी सात फेरे घेतांना राहुलला प्रत्येक सुखदुःखात साथ देण्याचं वचन दिलं होतं. जर तो व्यसनी असला असता किंवा त्याचे परस्त्री सोबत संबंध असले असते तर मी त्याला लगेच सोडून गेले असते. पण त्यात असला कुठलाही दोष नाहीये. तो माझा आदर करतो. माझी काळजी घेतो. माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. यापेक्षा अधिक काय अपेक्षा असते एका पत्नीची? उलट या परिस्थितीत त्याला माझी खूप गरज आहे. माझ्या आधाराची त्याला गरज आहे. आम्ही मिळून नियतीने मांडलेल्या या खेळाशी लढा देऊ."

तिचे बाबा म्हणाले, "बघ. नंतर पश्चाताप होईल."

ती काहीही बोलली नाही. तिचे बाबा निघून गेले. राहुल तिथेच बसलेला होता. तुटून गेला होता तो. त्याला सर्वांचे कडू बोल खूप टोचत होते. तो स्वतः लाच कोसू लागला. त्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्टार्टअप सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला पूर्ण विश्वास होता. रश्मीनेही त्याच्या निर्णयाची प्रशंसा केली होती. पण सर्वकाही उलटंच झालं. तसेच आता कुठल्या नोकरीसाठी इंटरव्हयू द्यायला गेल्यावर ते पहिली नोकरी सोडण्याचं कारण विचारायचे आणि त्याचं उत्तर ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार होत नव्हते.

सर्वजण त्याची अवहेलना करू लागले होते. त्याला मूर्ख म्हणायचे.

"चांगली नोकरी सोडून आता घरीच बसला." असे कटू शब्द ऐकवायचे.

रश्मी त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर तिने हात ठेवला.

ती म्हणाली, "बाबांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. वाटलं तर त्यांच्या वतीने मी माफी मागते."

तो तिच्या मांडीवर डोकं ठेऊन रडू लागला.

तो म्हणाला, "माझ्या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागतेय. मला माफ कर! मी तुला सगळ्या सुखसोयी नाही देऊ शकत. काही दिवसांनी तर परिस्थिती आणखीनच वाईट होईल."

ती म्हणाली, "मला कोणत्याही सुखसोयिंपेक्षा तुझी साथ जास्त महत्वाची वाटते. आपण मिळून प्रयत्न करूत ना. मीही जेवढी शक्य असेल तेवढी मदत करेन. तू पुन्हा एकदा प्रयत्न करून बघ. अजून वेळ गेलेली नाही. तुझी आयडिया खरंच चांगली आहे. परिस्थिती नक्की बदलेल."

जीवनात यश-अपयश चालूच असतात. असे फार कमी लोक असतील जे कधी अयशस्वी झालेच नाही, किंबहुना नसतील ही. पण कधीकधी काही अपयश असे असतात जे माणसाला पूर्ण तोडून टाकतात. माणसामध्ये परत प्रयत्न करण्याची हिम्मतच उरत नाही. वरून सर्वजण आपल्याला टोमणे मारत असतात. अशा वेळी माणसाला सल्ल्याची नाही तर कुणाच्यातरी सोबतीची गरज असते. अशा वेळी पैश्यांच्या किंवा इतर मदतीपेक्षा प्रोत्साहणाचे दोन शब्द जास्त प्रभावी ठरतात. वि. वा. शिरवाडकरांची ती कविता तर ऐकलीच असेल, 'पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा.'

रश्मीच्या आधाराने तो स्वतः ला सावरू शकला. रश्मी कोणत्याही परिस्थितीत त्याच्या सोबत आहे व आनंदी आहे, हे बघून त्याला खूप धीर मिळाला.

त्याने परत त्याच्या स्टार्टअप वर काम करणं सुरु केलं. यावेळेस त्याच्याजवळ अनुभवसुद्धा होता. मागच्या वेळी केलेल्या चुका त्याने यावेळेस टाळल्या. तसंच रश्मीनेही त्याला हातभार लावला. प्रेसेन्टेशन तयार करणे, सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करणे अशी कामं ती त्याच्या टीम सोबत करू लागली.

बघता-बघता त्यांची परिस्थिती सुधारू लागली. गाडी परत रुळावर येऊ लागली होती. त्यांच्या सर्व आर्थिक समस्या हळूहळू संपू लागल्या होत्या.

एका छोट्याश्या हॉल मध्ये सुरु झालेल्या त्यांच्या स्टार्टअप चे रूपांतर एका मोठ्या कंपनीत झाले होते. त्यांनी उदघाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. सर्व पाहुणेमंडळींना आमंत्रित केले होते. जे लोक काही महिन्यांपूर्वी राहुलची अवहेलना करत होते तेच आज त्याच्या मेहनतीचे व यशाचे गुणगान गाऊ लागले.

उदघाटनाच्या वेळी राहुलने कैची रश्मीच्या हातात दिली.

तो बोलू लागला, "माझी स्वीटहार्ट माझ्या वाईट परिस्थितीत माझ्या पाठीशी उभी राहिली. तिनेच मला सावरलं. या यशाचं जेवढं श्रेय माझं आहे तेवढंच तिचं पण आहे. त्यामुळे उदघाटन तिच्या हस्ते व्हावं ही माझी इच्छा आहे."

रश्मीच्या डोळ्यांत पाणीच आलं. तिने रिबन कापलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

रश्मी व राहुल इतर पाहुण्यांशी बोलत असतांना राहुलने रश्मीच्या बाबांना त्यांच्याकडे येतांना बघितलं. राहुल तेथून निघून गेला.

तिचे बाबा म्हणाले, "जावई नाराज आहेत वाटतं?"

ती म्हणाली, "बाबा तुम्ही काही घेतलंच नाही. वेटर यांना कोल्ड्रिंक्स द्या."

रश्मी पण त्यांच्याशी जास्त बोलली नाही. आईशी मात्र मनमोकळ्या गप्पा मारल्या. घरी येण्याचा आग्रह पण केला ; पण ते आले नाही. घरी परतायचं होतं त्यांना लवकर.

घरी आल्यावर रश्मी आरश्यासमोर तिचे दागिने काढत होती. राहुलने मागून येऊन तिला घट्ट पकडले. दोघे फार खुश होते.

राहुल म्हणाला, "हा आनंद फक्त उदघाटणाचा नाही दिसत. अजून काहीतरी कारण आहे. सांग ना काय झालं?"

रश्मी म्हणाली, "हो उदघाटणाचा आनंद तर आहेच पण आई होणार याचा पण आहे."

त्याने तिच्या खांद्यांना धरून तिच्या डोळ्यांत बघून विचारलं, "खरंच?"

तिने लाजून होकारार्थी मान हलवली. तो तिला उचलून गोलगोल फिरू लागला.

रश्मी आनंदाने म्हणाली, "अरे!!"

त्याने तिला खाली उतरवलं. तिला घट्ट मिठी मारली. त्यांच्या घरी आनंदाचा डबल धमाका झाला होता.

राहुल म्हणाला, "तूझ्या आईबाबांना सांगितलं?"

तिला जाणवलं त्याने बाबांना माफ केलं होतं. तिनेही मनातून राग काढून टाकला. घरी फोन करण्यासाठी तिने फोन हातात घेतला.

© Akash Gadhave

Popular Posts

तू बेस्ट मम्मा आहेस

डिसेंबर २९, २०२५

तू बेस्ट मम्मा आहेस

धनश्री ऑफिसमधून परतली. तिने तिची स्कुटी घरासमोर पार्क केली आणि गेट अर्धे उघडले. तेवढ्यात तिला काहीतरी आठवले. तिने तिचे दोन्ही डोळे गच्च मिटवले. तिला आठवले कि तिला वर्तिकाला शाळेतून आणायला जायचे होते. रस्त्यातच वर्तिकाची शाळा होती. ती तशीच मागे वळली व वर्तिकाला घेण्यासाठी निघाली.

Read more →
महत्व

डिसेंबर 3१, २०२५

महत्व

शुभांगी घरासमोर रांगोळी काढत होती. तीनच महिने झाले होते तिचं लग्न होऊन. घरात कशाचीही कमी नव्हती. सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. घरात दोनच माणसं राहत होती. ती आणि तिचा पती. सासुसासरे गावाकडे दिरासोबत राहत होते. काम करण्यासाठी नोकरचाकर सुद्धा होते. फक्त कधीकधी तिला थोडं एकटं-एकटं वाटायचं; पण ती स्वतः ला कशाततरी रमवून घ्यायची.

Read more →
मॉडर्न सुनबाई

डिसेंबर 3१, २०२५

मॉडर्न सुनबाई

रियाला साडीमध्ये थोडं अनकमफर्टेबल वाटत होतं. ते तिच्या चालण्यावरून व सोफ्यावर बसल्यानंतर केलेल्या चुळबुळीवरून जाणवत होतं. ती अजूनच नर्वस झाली. तिने शशांकच्या आईबाबांकडे बघितलं आणि तिला असं वाटलं की नक्कीच यांना कळलं असेल की तिने पहिल्यांदा साडी नेसली आहे!

Read more →
फक्त तुझी साथ हवी ! | Alvaar