Alvaar मराठी साहित्य ब्लॉग लोगो

महत्व

by Akash Gadhave · डिसेंबर 3१, २०२५

mahatv_2

शुभांगी घरासमोर रांगोळी काढत होती. तीनच महिने झाले होते तिचं लग्न होऊन. घरात कशाचीही कमी नव्हती. सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. घरात दोनच माणसं राहत होती. ती आणि तिचा पती. सासुसासरे गावाकडे दिरासोबत राहत होते. काम करण्यासाठी नोकरचाकर सुद्धा होते. फक्त कधीकधी तिला थोडं एकटं-एकटं वाटायचं; पण ती स्वतः ला कशाततरी रमवून घ्यायची.

गेटच्या आवाजाने तिची नजर गेटकडे वळली. सविता होती. सविता त्यांच्या घरी धुणं-भांडी करायची. पण आज सविता एकटी आलेली नव्हती. तिच्यासोबत एक लहान मुलगा पण होता. त्याला बघून शुभांगीच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. लहान मुलं कुणाला नाही आवडत?

सविता म्हणाली, "माफ करा मॅडम. घरी कुणीच नव्हतं. याच्या मोठ्या भावाला घेऊन त्याचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत. त्यामुळं याला बरोबर आणलं. पण तुम्ही काळजी करू नका तो कशालाही हात लावणार नाही. तो चुपचाप एका जागी बसेल."

शुभांगी म्हणाली, "अगं हो. ठीक आहे. काही हरकत नाही."

शुभांगीने त्याचे गाल ओढले. हलकसं हसली. तोही थोडासा हसला. नंतर शुभांगीने त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला त्याचं नाव विचारलं.

शुभांगी म्हणाली, "नाव काय आहे तुझं?"

तो म्हणाला, "विजय."

तेवढ्यात तिच्या कानावर फोनचा आवाज पडला. ती घाईने घरामध्ये गेली. ती थोडीशी लाजली. तिला माहित होतं की तिच्या पतिचा फोन होता.

तिने फोन उचलला, "हॅलो. इतकी आठवण येते का रोज तुला माझी?"

तिचा पती म्हणाला, "हो ना. तुला नाही येत वाटतं माझी आठवण!"

ती म्हणाली, "हो. खूप येते."

ती एके दिवशी म्हणाली होती की तिला एकटीला घरी कधीकधी करमत नाही. तेव्हापासून तो तिला रोज लंचब्रेक मध्ये फोन करायचा. तिला त्याने थोडं बरं वाटायचं. ती बोलता-बोलता गच्चीवर जाऊन पोहोचली. नंतर त्याने फोन ठेवला. फोन ठेवल्यावर गच्चीवरूनच तिचं लक्ष विजयवर गेलं. विजय शांतपणे एका दगडावर बसला होता. तिला त्याच्या समजूतदारपनाचं नवल वाटलं. सर्वसामान्यपणे मुलं ही खोडकर असतात. अशी एका जागेवर काहीही न करता बसणारी मुलं क्वचितच बघायला मिळतात.

ती विचारांत हरवली होती. तेवढ्यात तिच्या कानांवर पाणी वाहण्याचा आवाज पडला. तिचे लक्ष त्या आवजाकडे गेले. तिने बघितलं की नळ आलेले होते. ती मागच्या वेळी नळ बंद करायला विसरली होती! ती नळ बंद करण्यासाठी खाली येण्याच्या तयारीत होती तेवढ्यातच विजयने उठून नळ बंद केला. तिला फार छान वाटलं. एवढ्या लहान वयात तो बऱ्याच गोष्टी शिकला होता.

शुभांगी खाली आली. तिने टी. व्ही चालू केली. ती थोडा वेळ टी. व्ही बघत बसली. तेवढ्यात तिचे लक्ष बाहेर पडलेल्या उन्हाकडे गेले. तिला आठवलं विजय अजूनही बाहेरच बसला होता. ती बाहेर आली. तो शांतपणे तिथेच बसलेला होता. खरंच शांत लोक बऱ्याच गोष्टी तक्रार न करता सहन करत असतात!

शुभांगीने त्याला आत बोलावलं. तो अगोदर मानेनेच नको म्हणाला. नंतर शुभांगीने प्रेमाने बोलावलं.

ती म्हणाली, "चल. खूप ऊन पडलं आहे. आई नाही रागावणार चल."

तो हळूच उठला. तिचं बोट धरून चालू लागला. त्याने त्याची चप्पल दूरच काढली. घरामध्ये प्रवेश करतांना सुद्धा त्याने स्वतः चे पाय चांगले पुसून घेतले. नक्कीच फरशीवर डाग उमटू नये असाच त्याचा बेत होता. एवढ्या लहान वयात एवढ्या काळजीने वागणं बघून, शुभांगीला नवल वाटलं.

ती सोफ्यावर येऊन बसली आणि टी. व्ही बघू लागली. तिने काही क्षणांनी बघितलं की तो तिथेच उभा होता.

ती म्हणाली, "बस खाली."

तिने परत बघितलं, तो फरशीवरच बसला होता. ती एक क्षण त्याच्याकडे बघतच राहिली.

तिला जाणवलं की याला कदाचित भूक लागली असेल. ती एक बिस्कीट चा पुडा घेऊन आली. सविताचं पण काम आटोपलं होतं. ती विजयला घेऊन निघायच्या तयारीत होती. शुभांगीने त्याला एक बिस्कीट काढून दिलं. त्याने ते थोडा संकोच करून घेतलं. त्याने काहीतरी विचार केला.

मंग तो म्हणाला, "अजून एक मिळेल?"

सविता थोडं रागाच्या स्वरात म्हणाली, "विजय!"

शुभांगी म्हणाली, "अगं घेउदे. लहान आहे तो."

तेवढ्यात विजय म्हणाला, "दादासाठी!"

शुभांगीच्या गालावर हलकसं हास्य आलं. सविताचा पण राग शांत झाला. शुभांगी विचार करू लागली, स्वतः च्या अगोदर त्याने त्याच्या भावाचा विचार केला. इतकं सामंजस्य यात कोठून आलं? सामान्यत: तिने भावंडांना खाऊसाठी भांडतांना बघितलं होतं; पण हे दृश्य निराळंच होतं.

तिने पूर्ण पुडाच त्यांच्या हातात दिला. सविता नको-नको म्हणत होती पण शुभांगीने ऐकलं नाही. त्याने तो पुडा खूप जपून आईच्या बॅगमध्ये ठेवला.

सविता म्हणाली, "निघते मी मॅडम. या वेळेत आमच्या इकडे पाणी येत असतं. घरी कुणी नाहीये. पाणी भरलं नाही तर पुढचे काही दिवस खूप कष्टात जातील!"

शुभांगी तिचं बोलणं ऐकून थोडीशी गंभीर झाली. समाजात असलेली विषमता तिला जाणवली. त्यांच्याकडे बोअर व नळ दोन्ही होते. शिवाय टँकर घेणं पण त्यांच्यासाठी महाग नव्हतं. पण सविताचं तसं नव्हतं. कदाचित यामुळेच विजयला वाया जात असलेलं पाणी बघवलं नसेल. तसं तर पाणी सर्वांसाठी च महत्वाचं असतं. जीवनावश्यक असतं ; पण त्यांच्यासाठी त्याचं महत्व खूपच जास्त होतं. तसंच बिस्कीटचा पुडा पण त्याच्यासाठी खूप महत्वाचा होता, त्यामुळेच तर त्याने तो इतका जपून बॅगमध्ये ठेवला होता.

शुभांगीच्या पायाला काहीतरी जाणवलं. ती विचारांनातून बाहेर आली. विजय तिच्या पाया पडत होता. तिने त्याला उठवलं.

शुभांगी म्हणाली, "अरे. राहूदे."

नंतर ते निघून गेले.

© AKash Gadhave

Popular Posts

तू बेस्ट मम्मा आहेस

डिसेंबर २९, २०२५

तू बेस्ट मम्मा आहेस

धनश्री ऑफिसमधून परतली. तिने तिची स्कुटी घरासमोर पार्क केली आणि गेट अर्धे उघडले. तेवढ्यात तिला काहीतरी आठवले. तिने तिचे दोन्ही डोळे गच्च मिटवले. तिला आठवले कि तिला वर्तिकाला शाळेतून आणायला जायचे होते. रस्त्यातच वर्तिकाची शाळा होती. ती तशीच मागे वळली व वर्तिकाला घेण्यासाठी निघाली.

Read more →
फक्त तुझी साथ हवी !

डिसेंबर 3१, २०२५

फक्त तुझी साथ हवी !

रश्मीचे बाबा रश्मीला समजावत होते, "हे बघ आमचं ऐक. याच्यासोबत राहून काही फायदा नाहीये. अजूनही वेळ आहे. आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते."

Read more →
मॉडर्न सुनबाई

डिसेंबर 3१, २०२५

मॉडर्न सुनबाई

रियाला साडीमध्ये थोडं अनकमफर्टेबल वाटत होतं. ते तिच्या चालण्यावरून व सोफ्यावर बसल्यानंतर केलेल्या चुळबुळीवरून जाणवत होतं. ती अजूनच नर्वस झाली. तिने शशांकच्या आईबाबांकडे बघितलं आणि तिला असं वाटलं की नक्कीच यांना कळलं असेल की तिने पहिल्यांदा साडी नेसली आहे!

Read more →
महत्व | Alvaar