Alvaar मराठी साहित्य ब्लॉग लोगो

मॉडर्न सुनबाई

by Akash Gadhave · डिसेंबर 3१, २०२५

modern-sunbai_4

रियाला साडीमध्ये थोडं अनकमफर्टेबल वाटत होतं. ते तिच्या चालण्यावरून व सोफ्यावर बसल्यानंतर केलेल्या चुळबुळीवरून जाणवत होतं. ती अजूनच नर्वस झाली. तिने शशांकच्या आईबाबांकडे बघितलं आणि तिला असं वाटलं की नक्कीच यांना कळलं असेल की तिने पहिल्यांदा साडी नेसली आहे!

रिया आणि शशांक यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघेही चांगली नोकरी करत होते. लग्नाचं वयही झालं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगायचं ठरवलं. अगोदर रियाने शशांक ची तिच्या आईवडिलांशी भेट घालून दिली होती आणि त्यांनी त्याला स्वीकारलं होतं. शशांक तर पास झाला होता, आता रियाची वेळ होती.

ती विचार करू लागली, "शशांक ला दोन्ही कसं जमतं? तो वेळ पडल्यावर मॉडर्न होतो आणि वेळ पडल्यावर ट्रॅडिशनल. त्यामुळे त्याला तर कुणीही पसंत करणार होतं. मला वाटत तर नाहीये याचे आईवडील स्वीकारतील मला."

शशांक च्या आईने चहा व नाष्टा टेबल वर ठेवला. रिया विचारांतून बाहेर आली. शशांक ची आई तिच्या मनगटावरील टॅटू कडे बघत होती. रियाला ते जाणवलं. तिने लगेच तिचं मनगट पदराखाली लपवलं. ती अजून थोडी घाबरली. शशांकला पण थोडी भीती वाटू लागली.

शशांक च्या आईबाबांनी तिला साध्यासाध्या गोष्टींबद्दल विचारलं. शिक्षण, जॉब, इत्यादी. तिला थोडं बरं वाटलं. निदान त्यांनी स्वयंपाक, घरकाम यांबद्दल तरी नाही विचारलं. तसंतर तिने युट्युब वर बघून दोनतीन रेसिपी शिकल्या होत्या. विचारलं असतं तर ती त्यांबद्दलच सांगणार होती.

बोलता -बोलता तिला आठवलं की ती विचार करून आली होती की सर्वांत अगोदर शशांक च्या आईवडिलांच्या पाया पडायच्या. पण ही गोष्ट तिच्या डोक्यातूनच गेली होती. तिने डोक्याला हातच लावला.

तिला जाणवलं की अगोदरच आपलं खूप बॅड इंप्रेशन पडलेलं आहे. त्यामुळे त्यांचा चहा-नाश्ता झाल्यावर तिने ट्रे स्वतःहून किचनमध्ये नेऊन ठेवायचं ठरवलं. निदान त्यामुळे थोडा पॉसिटीव्ह परिणाम होईल असं तिला वाटलं. तिने ट्रे उचलला व ती किचनच्या दिशेने जाऊ लागली.

शशांक ची आई म्हणाली, "अगं राहूदे. मी ठेवते."

ती म्हणाली, "नको. ठीक आहे. ठेवते मी."

पण मधेच तिच्याकडून ट्रे मधील दोन कप खाली पडले व फुटले देखील. आता तर ती खूपच घाबरली. ती रडायलाच लागली. मागून शशांक ची आई आली व तिच्या पाठीवर हात ठेवला.

त्या म्हणाल्या, "जाऊदे. होत असतं. शांत हो. त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे?"

नंतर त्या दोघींनी ते पडलेले तुकडे उचलून कचरापेटीत टाकले. आता तर तिला कोणती उमेदच नव्हती राहिली.

ती बोलू लागली, "सॉरी काकू. मी आज पहिल्यांदाच साडी नेसली आहे. मी याआधी कधीच नेसली नव्हती. त्यामुळे हे सगळं होत आहे. मी जास्त घरकाम पण केलेलं नाही. स्वयंपाकही नाही येत मला."

एवढं बोलून ती खाली नजर करून उभी राहिली. थोडया वेळाने तिने नजर वर करून बघितलं. शशांक चे आईबाबा हसत होते. तिला काही कळलेच नाही. शशांकला पण नेमकं काय घडतंय हे कळलं नाही.

शशांक ची आई बोलू लागली, "अगं त्यात एवढं दुःखी कशाला होतेय. तू नोकरी करतेस, चांगले पैसे कामावतेस. त्याच्यासोबतच तुला घरकाम, स्वयंपाक हे पण यावं ही अपेक्षा चुकीची ठरेल. त्यासाठी कामवाली बाई आपण ठेऊ शकतो. तुला सगळंच यावं अशी आमची अपेक्षा नाहीये. तसंही सुखी संसारासाठी एकमेकांची मनं जुळणं गरजेचं आहे. तसंही शशांक नेहमी कोणतीही गोष्ट विचार करून निवडतो. त्याची निवड चांगलीच असणार याची आम्हाला खात्री आहे."

नंतर त्याचे बाबा म्हणाले, "आणि राहिला प्रश्न कपड्यांचा. तर कपड्यांवरून माणसाला जज करणं चुकीचं आहे. आमचा बिलकुल आग्रह नाही की तू साडीच नेसावी. तुला जे योग्य वाटत असतील ते कपडे तू घालू शकतेस."

आता तिचा चेहरा थोडासा खुलला होता. तिने सुटकेचा श्वास सोडला. शशांक पण खुश झाला होता.

तिने विचारलं, "म्हणजे मी तुम्हाला पसंत आहे?"

शशांक ची आई म्हणाली, "हो मंग."

तिने शशांक च्या वडिलांच्या पाया पडल्या. नंतर ती त्याच्या आई च्या पाया पडू लागली. त्यांनी तिला थांबवलं.

त्या म्हणाल्या, "अगं. सून मॉडर्न म्हणाल्यावर सासूला पण मॉडर्न व्हावं लागेल ना. पाया काय पडतेय! गळ्यात पड माझ्या."

ती खूप खुश झाली.

नंतर त्या म्हणाल्या, "तसं टॅटू छान बनवला आहे."

सगळे हसायला लागले.

© Akash Gadhave

Popular Posts

तू बेस्ट मम्मा आहेस

डिसेंबर २९, २०२५

तू बेस्ट मम्मा आहेस

धनश्री ऑफिसमधून परतली. तिने तिची स्कुटी घरासमोर पार्क केली आणि गेट अर्धे उघडले. तेवढ्यात तिला काहीतरी आठवले. तिने तिचे दोन्ही डोळे गच्च मिटवले. तिला आठवले कि तिला वर्तिकाला शाळेतून आणायला जायचे होते. रस्त्यातच वर्तिकाची शाळा होती. ती तशीच मागे वळली व वर्तिकाला घेण्यासाठी निघाली.

Read more →
महत्व

डिसेंबर 3१, २०२५

महत्व

शुभांगी घरासमोर रांगोळी काढत होती. तीनच महिने झाले होते तिचं लग्न होऊन. घरात कशाचीही कमी नव्हती. सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. घरात दोनच माणसं राहत होती. ती आणि तिचा पती. सासुसासरे गावाकडे दिरासोबत राहत होते. काम करण्यासाठी नोकरचाकर सुद्धा होते. फक्त कधीकधी तिला थोडं एकटं-एकटं वाटायचं; पण ती स्वतः ला कशाततरी रमवून घ्यायची.

Read more →
फक्त तुझी साथ हवी !

डिसेंबर 3१, २०२५

फक्त तुझी साथ हवी !

रश्मीचे बाबा रश्मीला समजावत होते, "हे बघ आमचं ऐक. याच्यासोबत राहून काही फायदा नाहीये. अजूनही वेळ आहे. आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते."

Read more →
मॉडर्न सुनबाई | Alvaar