तू बेस्ट मम्मा आहेस
by Akash Gadhave · डिसेंबर २९, २०२५

धनश्री ऑफिसमधून परतली. तिने तिची स्कुटी घरासमोर पार्क केली आणि गेट अर्धे उघडले. तेवढ्यात तिला काहीतरी आठवले. तिने तिचे दोन्ही डोळे गच्च मिटवले. तिला आठवले कि तिला वर्तिकाला शाळेतून आणायला जायचे होते. रस्त्यातच वर्तिकाची शाळा होती. ती तशीच मागे वळली व वर्तिकाला घेण्यासाठी निघाली.
वर्तिका ही धनश्रीची मुलगी. ती इयत्ता तिसरी मध्ये शिकत होती. पण गप्पा मात्र मोठया माणसांसारख्या करायची. धनश्री शाळेत पोहोचली. जवळपास सर्व मुलं-मुली घरी निघून गेले होते. धनश्रीची नजर वर्तिकाला शोधू लागली. वर्तिका एका बाकावर गालाला हात टेकवून बसलेली होती. धनश्री तिच्यासमोर येऊन उभी राहिली. ती हळूच उठली, दप्तर पाठीवर अडकवले, धनश्रीचे बोट पकडले व खाली मान करून उभी राहिली. धनश्रीला फार वाईट वाटू लागले.
धनश्रीने वर्तिकाला पकडून तिला स्कुटीवर बसवले आणि विचारले, "बाळा. मम्माचा राग आला का?" वर्तिकाने नकारार्थी मान हलवली.
"मंग काय झालं?" धनश्रीने विचारलं. वर्तिका म्हणाली, "भूक लागली."
धनश्रीला आश्चर्य वाटले. "टिफिन घरी विसरला का?" तिने विचारले. "हमम," वर्तिका म्हणाली.
"काहीच खाल्लं नाही तू दुपारपासून?" धनश्रीने विचारलं. वर्तिका म्हणाली, "श्रेया ने थोडा टिफिन शेअर केला होता. पण तरीसुद्धा भूक लागली."
धनश्रीने पटकन गाडी काढली व तिला एका रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेली. धनश्रीला फार वाईट वाटत होते. रेस्टॉरंट मध्ये फार छान सुगंध येत होता. धनश्रीने वेटरला बोलावले.
धनश्री म्हणाली, "एक मसाला डोसा. लवकर आना प्लिज."
वेटरने डोसा त्यांच्या टेबलवर ठेवला. धनश्री तिला तिच्या हाताने डोसा भरविण्यासाठी डोस्याला हात लावणारच होती.
तेवढ्यात वर्तिका म्हणाली, "हात धुतलेस का?" धनश्री म्हणाली, "ओह. सॉरी."
त्यांनी त्यांचे हात धुतले. नंतर धनश्रीने वर्तिकाला हाताने डोसा भरविला. तिने तो आवडीने संपवला. त्या छोट्याश्या मुलीने पूर्ण डोसा संपवलेला बघून धनश्रीला कळलं कि हिला खूपच जोऱ्याची भूक लागली होती. नंतर तिने गटगट पाणी पिल. आता वर्तिकाचा चेहरा खुलला होता.
धनश्रीने परत वेटरला आवाज दिला. "ऑर्डर मॅडम." वेटर म्हणाला.
धनश्री म्हणाली, "एक आईस्क्रीम. स्ट्रॉबेरी फ्लेवर. आमच्या वर्तिकाचं फेव्हरेट."
एवढ्या वेळानंतर आता कुठं वर्तिकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. धनश्री सुखावली. तिला आता थोडं हलकं-हलकं वाटू लागलं.
तेवढ्यात वर्तिका म्हणाली, "तुला पण मागव."
धनश्रीने वेटरला दोन आईस्क्रीम सांगितल्या. धनश्री वर्तिकाकडे नवलाईने बघू लागली. वर्तिकाने इशाऱ्याने विचारलं कि काय झालं? धनश्री हसून मानेनंच काही नाही म्हणाली. दोघींनी आईस्क्रीम संपवली.
स्कुटीवरून घरी येतांना वर्तिकाने तिच्या आईला मागून घट्ट पकडले होते व तिचा डाव गाल आईच्या पाठीवर टेकवून डोळे अलगद बंद केले होते.
स्कुटी थांबली. त्या दोघी घरी पोहोचल्या होत्या. धनश्रीने वर्तिकाला खाली उतरविले. ती फार खुश दिसत होती. धनश्रीला बरं वाटलं.
वर्तिकाची आजी म्हणाली, "सॉरी. अगं माझ्याकडून तिचा टिफिन भरायचं राहूनच गेलं." धनश्री म्हणाली, "होत असतं सासूबाई. जाऊद्या."
धनश्रीने वर्तिकाला झोपवले. नंतर तिने तिच्या सासूला गोळया दिल्या. सर्व भांडे किचनमध्ये नेऊन ठेवले. फरशी झाडून काढली व परत झोपण्यासाठी आली.
धनश्रीला जाणवले कि वर्तिकाला झोप येत नव्हती. वर्तिका तिचे पाय मागे-पुढे करत होती. तिच्या मनात दिवसभरचा प्रसंग आठवला. आपलं बाळ खूप दमलं असेल, याची तिला जाणीव झाली.
तिने वर्तिकाच्या डोक्यावरून हात फिरवला. नंतर ती वर्तिकाचे पाय दाबू लागली. थोड्या वेळाने वर्तिकाला बर वाटू लागलं.
ती म्हणाली, "बस मम्मी. झोप तू आता."
तिला जवळ घेत धनश्री म्हणाली, "मी बॅड मम्मा आहे ना पिलू!"
वर्तिका म्हणाली, "नाही मम्मा… तू बेस्ट मम्मा आहेस."
आपल्या मुलाने किंवा मुलीने आपल्याला बेस्ट मम्मा चा किताब देणं यापेक्षा मोठा सन्मान एका आईसाठी दुसरा कोणता असेल?
खरं तर प्रत्येक मम्मा बेस्टच असते. तिला आपली सुख-दुःख, आवडीनिवडी सर्वकाही माहीत असतं.
© Akash Gadhave


