Alvaar मराठी साहित्य ब्लॉग लोगो

गोड गोजिरी

by Akash Gadhave · जानेवारी १९, २०२६

god-gojiri_6

प्रणिता व वरद यांना एक छोटीशी मुलगी होती. तिचे नाव प्राची. तीन जणांचं छोटंसं कुटुंब. प्राची ही तिच्या गोल-गोल गालांमुळे, मधुर आवाजामुळे व तिच्या गोड हसण्यामुळे सर्वांची लाडकी. शेजारी राहणाऱ्या मंडळींनाही ती फार आवडायची.

एकदा वरद ऑफिस मध्ये गेलेला होता. प्रणिता प्राचीला घेऊन मार्केटमध्ये गेलेली होती. परत येतांना प्रणिताला एका दुकानात असलेला फ्लॉवर पॉट खूप आवडला. त्यावर खूप सुंदर नक्षीकाम केलेलं होतं व त्यावरील रंगांची मिसळण खूप मनमोहक वाटत होती. तिने तो विकत घेतला व घरी परतली.

तिने तो फ्लॉवर पॉट टेबलावर ठेवला व भाजीपाला घेऊन किचन मध्ये गेली. तो पॉट खूपच मनमोहक होता म्हणून प्राची त्याला जवळ जाऊन बघू लागली. त्यावरील छोटया-छोट्या मोत्यांना हात लावून बघू लागली. थोड्या वेळाने प्रणिताच्या कानावर काहीतरी पडल्याचा आवाज आला. ती धावतच हॉलमध्ये आली. तिने बघितलं कि फ्लॉवर पॉट जमिनीवर तुटून पडलेला होता. प्राची त्याच्या जवळच उभी होती.

तिला प्राचीचा खूप राग आला. तिने धावतच येऊन तिच्या पाठीवर दोन-तीन दणके ठेऊन दिले. ती रडायला लागली. अश्रुंचे दोन थेंब तिच्या डोळ्यांतून निघून तिच्या गोल गालावरून खाली निघून गेले.

प्रणिता म्हणाली, "काय मूर्ख मुलगी आहे ! तुला एका जागी शांत बसता येत नाही का? सतत काही ना काही हवंच असतं."

प्राची रडत-रडत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती ; पण प्रणिताने तिचं काहीच ऐकलं नाही. उलट प्रणिताच्या रागाने व तिच्या मोठ्या आवाजाने प्राची अजूनच कोमेजून गेली.

प्रणिता म्हणाली, "सरक. हो बाजूला. आवरू दे मला."

प्रणिताने तिला झटक्याने बाजूला केलं व जमिनीवर पडलेले काच जमा करू लागली. प्राची केविलवाण्या नजरेनं तिच्याकडे बघू लागली.

काच जमा करता-करता प्रणिताच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात एक काचेचा तुकडा घुसला. तिने तिचे डोळे गच्चं बंद करून घेतले. तिच्या मुखातून वेदनेने भरलेले स्वर उमटले. ती लगेच जमिनीवर बसली. तिने तो काच हाताने डोळे बंद करून काढला. तो काच काढताच त्या जखमेतून रक्त ओघळू लागले. प्राची प्रणिताच्या जवळ आली होती. ते रक्त बघून प्राची खूप घाबरली. तिने धावतच जाऊन तिचा हातरुमाल आणला. तिने तो रुमाल प्रणिताच्या अंगठ्याला लावला. ती अंगठ्याचे रक्त पुसू लागली.

लहान मूल असल्यावर ते मस्ती तर करणारच. मुळात हेच तर वय असतं मस्ती करायचं. पण कधीकधी या मस्तीमुळे बरंच नुकसान होऊन जातं. त्यामुळे पालकांचा संताप होतो. पण लहान-लहान मुलं पण कधी-कधी इतकी समजदारी दाखवतात कि पालक थक्क होऊन जातात. जसं की प्रणिता होऊन गेली.

रक्त पुसून झाल्यावर प्राची त्या जखमेवर फुंकर घालू लागली. आता मात्र प्रणिताचे डोळे भरून आले. फुंकर मारून झाल्यावर प्राची तो रुमाल तिच्या इवलुश्या हातांनी प्रणिताच्या अंगठ्याला बांधण्याचा प्रयत्न करू लागली. पण ते तिच्याकडून शक्य झाले नाही. पण तिची तळमळ बघून प्रणिताच्या डोळ्यांत साठलेलं पाणी वाहिलं.

प्रणिताने प्राचीला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला मिठीत घेतलं आणि डोळे झाकून घेतले.

प्राची म्हणाली, "आई तो फ्लॉवर पॉट मी नाही फोडला गं. ती मांजर पळत आली व तिच्या धक्क्यामुळे फुटला."

प्रणिताला आठवले की फ्लॉवर पॉट फुटण्याच्या अगोदर तिला 'म्याव-म्याव' आवाज आला होता. आता तर प्रणिताला फार वाईट वाटू लागले होते. तिला स्वतः चाच राग आला.

रडवेल्या स्वरात ती म्हणाली, "पहिले का नाही सांगितलं?"

प्राची म्हणाली, "तू ऐकूनच नाही घेतलं गं माझं. मला सांगायचं होतं तुला."

आता प्रणिता तिला घट्ट पकडून रडू लागली होती. तिला सॉरी म्हणाली. तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. जीवनात असं अनेकदा होतं, आपण समोरच्याच बोलणं ऐकून न घेता त्याला गुन्हेगार गृहीत धरतो! शिक्षाही देतो!

थोडक्यात मुलं खोड्या करतात. बऱ्याच वेळेस उपद्रव ही करतात. पण त्यांच्यामुळेच घर हसतं-खेळतं राहत. त्यांच्यामुळेच आपण घरात रमतो.

©Akash Gadhave

Popular Posts

तू बेस्ट मम्मा आहेस

डिसेंबर २९, २०२५

तू बेस्ट मम्मा आहेस

धनश्री ऑफिसमधून परतली. तिने तिची स्कुटी घरासमोर पार्क केली आणि गेट अर्धे उघडले. तेवढ्यात तिला काहीतरी आठवले. तिने तिचे दोन्ही डोळे गच्च मिटवले. तिला आठवले कि तिला वर्तिकाला शाळेतून आणायला जायचे होते. रस्त्यातच वर्तिकाची शाळा होती. ती तशीच मागे वळली व वर्तिकाला घेण्यासाठी निघाली.

Read more →
महत्व

डिसेंबर 3१, २०२५

महत्व

शुभांगी घरासमोर रांगोळी काढत होती. तीनच महिने झाले होते तिचं लग्न होऊन. घरात कशाचीही कमी नव्हती. सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. घरात दोनच माणसं राहत होती. ती आणि तिचा पती. सासुसासरे गावाकडे दिरासोबत राहत होते. काम करण्यासाठी नोकरचाकर सुद्धा होते. फक्त कधीकधी तिला थोडं एकटं-एकटं वाटायचं; पण ती स्वतः ला कशाततरी रमवून घ्यायची.

Read more →
फक्त तुझी साथ हवी !

डिसेंबर 3१, २०२५

फक्त तुझी साथ हवी !

रश्मीचे बाबा रश्मीला समजावत होते, "हे बघ आमचं ऐक. याच्यासोबत राहून काही फायदा नाहीये. अजूनही वेळ आहे. आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते."

Read more →
गोड गोजिरी | Alvaar