नवऱ्याची प्रेयसी !
by Akash Gadhave · डिसेंबर 3१, २०२५

स्वप्नील व अंजली यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती. त्यांना एक चार वर्षाचा मुलगा सुद्धा होता. शशांक नाव होतं त्याचं. एका सुखी कुटुंबासाठी जे-जे हवं असतं ते सगळं होतं त्यांच्यापाशी. दिवस सुखात जात होते.
तो रविवारचा दिवस होता. ते सगळे मॉलमध्ये गेले होते. चालता-चालता अंजलीची नजर एका मुलीवर पडली. दिसायला देखणी, स्टायलिश, कुणीही क्षणभर थांबून तिला बघावं अशी ती मुलगी. अंजलीला त्या मुलीला बघितल्यासारखं वाटत होतं. पण कुठं बघितलं आहे, ते मात्र आठवत नव्हतं. त्या मुलीची नजर स्वप्नीलवर पडताच तिची चालण्याची गती मंद झाली. ती अधिरतेने स्वप्निलच्या दिशेने येऊ लागली होती. अंजलीने थोडा वेळ स्वप्नीलकडे बघितलं. त्याचा हसरा चेहरा तिला गंभीर भासू लागला. अंजली विचारात पडली, कोण असेल ही?
ती मुलगी अगदी स्वप्निलच्या समोर येऊन उभी राहिली. थोडा वेळ ती त्याच्याकडे बघतच राहिली. स्वप्नीलने अंजलीकडे बघितले. त्याला तिच्या डोळ्यांत असुरक्षितता दिसली.
तो म्हणाला, "श्रेया, ही माझी पत्नी अंजली आणि हा माझा मुलगा शशांक. अंजली ही माझी वर्गमैत्रिण श्रेया."
श्रेयाच्या चेहऱ्यावर काही क्षणांपूर्वी आलेला आनंद मावळला. तिने तिच्या डोळ्यांवरील गॉगल काढला. अंजलीला तेव्हा लगेच आठवलं की ही तीच मुलगी होती जिचा फोटो तिने स्वप्निलच्या बॅगमध्ये बघितला होता. कोण होती ती? स्वप्नीलची प्रेयसी! लग्नाअगोदरची की नंतरची?
श्रेया अंजलीकडे बघत म्हणाली, "लकी आहेस तू. खूप चांगला नवरा मिळाला आहे तुला."
अंजलीला तिचं बोलणं ऐकून आणि हावभाव बघून अजूनच चिंता वाटू लागली.
श्रेया स्वप्नीलला म्हणाली, "सहा वर्षांपासून एक फोन पण नाही केलास! लग्न केलं, हेही नाही सांगितलं. आपलं काहीच नातं राहिलं नाही का आता?"
स्वप्नील म्हणाला, "अगं तसं काही नाही. आपण अजूनही चांगले मित्र आहोत. थोडा बीजी झालो होतो आयुष्यात. बरंच काही घडून गेलं ना सहा वर्षांत. तुझं नाही झालं का लग्न?"
ती म्हणाली, "नाही. पण मला फार राग आला आहे तूझ्या वागण्याचा. तू तर पार विसरून गेलास मला."
तो म्हणाला, "नाही. तसं काही नाहीये. चुकलंच माझं जरा. माफ कर मला."
ती म्हणाली, "बरं ठीक आहे, पण काही चुका आयुष्यभर टोचत राहतात!"
तिच्या शब्दांनी तो आठवणींच्या समुद्रात जाऊ लागला. अंजलीने त्याचा हात पकडला. तेवढ्यात तो वास्तवात आला.
तो म्हणाला, "चल निघतो, बाय."
ती हलकीशी हसली. शांत झाली; पण अंजलीला तिच्या डोळ्यांत साफ दिसत होतं की तिला बरंच काही बोलायचं होतं.
ते सर्वजण घरी परतले. अंजलीला स्वप्नीलचा अस्वस्थपणा जाणवत होता. अंजली विचारात पडली. श्रेया म्हणाली होती की, काही चुका आयुष्यभर टोचत राहतात! कोणती चूक? स्वप्नील आणि तिचं लग्न चूक होती का? तिला काहीच समजत नव्हतं. तिला त्यांचं नातं तुटण्याची भीती वाटू लागली. पण त्यांच्या आयुष्यात तर खूप आनंद होता. स्वप्नीलही खूप खुश होता. का आली ती सहा वर्षानंतर स्वप्निलच्या आयुष्यात? स्वप्नील सोडणार तर नाही ना तिला? ती विचारांच्या गुंफ्यात गुरफटू लागली. तिचे मन भरून आले होते.
इकडे स्वप्नीलही अस्वस्थ होता. तिच्यासोबतच्या सर्व आठवणी त्याने त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात डांबून ठेवल्या होत्या. त्या सर्व आठवणी त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागल्या. तो दिवस जेव्हा त्याने पहिल्यांदा श्रेयाला बघितलं होतं. पावसात ओलीचिंब झालेली श्रेया. रस्त्याने आडोश्याच्या शोधात धावत होती. मोकळा रस्ता. ती धावत येऊन त्याच्या छत्रीखाली येऊन थांबली. तो रिक्षाची वाट बघत उभा होता. तिने तिचे ओले केस झटकले. केसांतील पाणी त्याच्या टीशर्टवर उडालं.
ती तिच्या मधुर आवाजात म्हणाली, "सॉरी."
त्याने मान हलवली. त्याची नजर तिच्यावर स्थिर होती. तिच्या आवाजाने तो भानावर आला. तिने हात पुढे केला होता. त्यानेही त्याचा हात पुढे केला.
ती म्हणाली, "हाय. मी श्रेया, फर्स्ट इयर एम.इ, कॉम्पुटर."
त्यानेही त्याचा परिचय दिला. ते दोघे एकाच वर्गात होते. त्यांचा संवाद रंगला. नंतर भेटीगाठी होऊ लागल्या. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही सुखी संसाराचे स्वप्नं बघू लागले होते.
अंजलीच्या आवाजाने स्वप्नील भानावर आला. तिने जेवण वाढले होते. तो हात धुवून जेवायला बसला. अंजली पण त्याच्या शेजारीच बसली होती. तेवढ्यात स्वप्निलच्या मोबाईलवर कॉल आला, अननोन नंबरवरून. पण ट्रू कॉलरमुळे थोड्या क्षणांनी मोबाईलच्या स्क्रीनवर नाव झळकलं, श्रेया!
अंजली अस्वस्थ झाली. स्वप्नील मोबाईल घेऊन बाहेर गेला. अंजली अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत राहिली.
तेवीस मिनिटांनी तो परत आला. टेबलावर ताट तसेच पडलेले होते. त्याच्या कानांवर हुंदक्यांचा आवाज पडला. अंजली शेजारच्या रूममध्ये होती. तो रूममध्ये गेला. अंजली रडत होती. अजून किती वेळ आवरणार होती ती स्वतःला? स्वप्नीलला कळून चुकले की हिला सर्व परिस्थितीचा अंदाज आला असेलच. तो तिच्याजवळ जाऊन बसला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
तो म्हणाला, "अगं, जसं तू समजतेय तसं काही नाहीये."
त्याने तिच्या गालावर हात ठेवून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तिने त्याचा हात झटकला व परत मान दुसरीकडे वळवली.
तो म्हणाला, "अगं मी जवळजवळ तिला विसरून गेलो होतो. आमचा दोघांचा संपर्क पण झाला नाहीये सहा वर्षांपासून. तिच्याकडे माझा नंबर पण नव्हता. तिने एका मित्राकडून तो मिळवला. आपल्या लग्नाच्या एका महिन्यापूर्वीच आमचे ब्रेकअप झाले होते."
तिने विचारलं, "कशामुळे?"
तो पुढे सांगू लागला, "ती एका श्रीमंत घरची मुलगी आणि मी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा... नंतर काही दिवसांनी मी तुझ्याशी लग्न करायला होकार दिला."
तिचे रडणे थांबले होते. तिला थोडासा धीर मिळाला होता.
तिने पुढे विचारलं, "मग, आता कशासाठी फोन केला होता तिने?"
तो बोलू लागला, "ती माफी मागत होती. रडत होती. ती म्हणत होती की, तिच्या चुकीची खूप मोठी शिक्षा तिला मिळाली आहे."
तिने विचारलं, "अजून काय म्हणाली ती?"
तो सांगू लागला, "ती म्हणाली की, ती मला स्वीकारायला तयार आहे. जर मी तुला .............."
तो मधेच थांबला. अंजलीचे मन परत भरून आले.
ती म्हणाली, "ठीक आहे. तुला तिच्याबरोबर रहायचे असेल तर आम्ही निघून जातो तुझ्या आयुष्यातून."
ती डोळ्यांतील अश्रू लपवण्यासाठी खाली बघू लागली.
तो थोडंसं हसून म्हणाला, "माझा आनंद तुम्हा दोघांमध्ये आहे... मी एका मोत्यासाठी माझे हे जीवापाड प्रेम असलेले रत्न सोडणार नाहीये."
ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली.
ती म्हणाली, "सॉरी. मी तुला चुकीचं समजलं. माफ कर मला."
त्याने विचारलं, "मला सांग की तुला आमच्याबद्दल कसं कळलं?"
ती म्हणाली, "अरे तूझ्या स्टोअर रूममधील कॉलेज बॅगमध्ये तिचा फोटो बघितला होता मी."
त्याने डोक्याला हात लावला. तो लगेच उठला आणि त्याने तो फोटो फाडून कचरापेटीत टाकला. अंजलीला श्रेयाचे शब्द आठवले, "तू खूप लकी आहेस. तुला खूप चांगला नवरा मिळाला आहे." ती स्वतःशीच हसली.
समाप्त.
© Akash Gadhave


